नांदेड : सचखंड गुरुद्वारामध्ये दसरा मोठ्या उत्साहात साजरा झाला. दसरानिमित्त सचखंड गुरुद्वारामध्ये सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. सायंकाळी गुरुद्वारा इथं अर्दासकरून नगर कीर्तनाला सुरुवात झाली. गुरुद्वारा ते महावीर चौकापर्यंत नगर कीर्तन काढण्यात आलं. नगर कीर्तनामध्ये पंच प्यारेसाहिबान, हत्ती, घोडे, गतका पथक आणि निशान साहिब सहभागी झाले होते. महावीर चौक इथून पारंपारिक प्रतिकात्मक हल्ला (निहंग) करण्यात आला. यावेळी हातात शस्त्र घेऊन देश-विदेशातील भाविक सहभागी झाले होते. शीख धर्माचे दहावे गुरु, गुरू गोविंद सिंगजी यांनी निहंगची सुरूवात केली होती. यात शीख योद्धा (निहंग जत्थे) मार्शल आर्ट्स (गतका), तलवारबाजी आणि घोडेस्वारीच्या कौशल्याचं प्रदर्शन करतात. त्यामुळं याला 'सैनिकी हल्ला' किंवा 'चढाई' (हल्ला मोहल्ला) असं नाव मिळालं. नांदेडमधील हजूर साहिब इथं 'मोहल्ला' (सैनिकी मिरवणूक) काढली जाते. यामध्ये निहंग पारंपरिक वेशभूषेत आणि शस्त्रे घेऊन सहभागी होतात. हा उत्सव मोठ्या भक्तिभावानं आणि शौर्याचं प्रदर्शन करत साजरा केला जातो.
Be the first to comment