सातारा : सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली. अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचंही मोठं नुकसान झालं. या कठीण परिस्थितीत पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी 'आम्ही कराडकर MH50 ग्रुप'च्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आलं. या आवाहनाला कराड तसेच पाटण तालुक्यातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दानशूर नागरिकांनी केलेल्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून पूरग्रस्त कुटुंबांसाठी आवश्यक वस्तूंचे कीट तयार करण्यात आले आहेत. या कीटमध्ये संसारोपयोगी साहित्य, तीन महिन्यांसाठी पुरेलं इतकं धान्य, साड्या, अंथरूण, तसेच मुलांसाठी स्कूल बॅग आणि संपूर्ण शालेय साहित्य यांचा समावेश आहे. शनिवारी दिवसभरात ही मदत बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील 75 पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. ही मदत घेऊन कराडकर MH50 ग्रुपचे सदस्य शुक्रवारी सायंकाळी कराडहून बीडकडे रवाना झाले.
Be the first to comment