अहिल्यानगर : काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांना काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी भाजपा-राष्ट्रवादीच्या वतीनं श्रीनिवास बिहाणी यांना उमेदवारी दिली. भाजपाचे निष्ठावंत असलेले प्रकाश चित्ते यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केतन खोरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळं श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत आता चौरंगी लढत असल्याचं चित्र सध्या रंगले असलं तरी खरी लढत भाजपा-शिवसेना-काँग्रेस अशी तिरंगी होणार आहे.श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत महायुतीतील भाजपा आणि शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार दिल्याने महायुतीत फूट पडली आहे. महाविकास आघाडीत देखील फूट पडली आहे. मात्र, सध्या राजकीय वातावरण तापलं आहे ते म्हणजे माजी खासदार सुजय विखे विरुद्ध शिवसेनेचे उमेदवार प्रकाश चित्ते यांच्यात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपावरुन. पूर्वी भाजपात असलेल्या प्रकाश चित्ते यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती.
Be the first to comment