बीड : काँग्रेसच्या वतीने मत चोरीच्या विरोधात बीडमध्ये कॅन्डल मार्च काढून केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा विरोध करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्ह्लातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत चोरीबाबत आवाज उठवला आहे. त्यांनी अनेक गंभीर आरोप निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱयांवर केले आहेत.केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सध्या भाजपाची सत्ता आहे. या सत्तेच्या विरोधात काँग्रेसनं दंड थोपटले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस संविधान वाचवा असे आव्हान काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते, तर आता भाजपाने मताची चोरी केली आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हुतात्मा चौकापर्यंत कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.