संगमनेर (अहिल्यानगर) : आज आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा करण्यात आला. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील सह्याद्री संस्थेच्या डी. के. मोरे जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने "एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग" या थीममध्ये 1000 विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून सर्व विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली. योगाच्या माध्यमातून संपूर्ण पृथ्वीचे आणि मानवाचे आरोग्य टिकवण्यासाठी एकत्र प्रयत्न करावेत. यामध्ये पर्यावरण, मानवी आरोग्य, मानसिक संतुलन आणि वैश्विक एकतेवर भर दिला आहे. योग ही केवळ व्यायाम पद्धत नाही तर ती एक जीवनशैली आहे. जी संपूर्ण मानवाला आणि आपल्या निसर्गाला सशक्त आणि निरोगी ठेवू शकते. योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी मानवी साखळी तयार करून विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली. ही संकल्पना विद्यालयातील क्रीडाशिक्षक बाळासाहेब कांडेकर आणि कलाशिक्षक सत्यानंद कसाब यांनी साकारली. तर योग शिक्षक बाळासाहेब कांडेकर यांनी विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिके करून दाखवली.
Be the first to comment