नागपूर : राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळं बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडं मंत्री आणि सत्ताधारी आमदारांसह विरोधक निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची पाहणी दौरे करत आहे. तर नागरिकांना अद्याप आश्वासनांशिवाय काहीही मिळालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांनी आणि खासदारांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आपलं एक महिन्याचं संपूर्ण वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी 6 महिन्यांचा पगार 'मुख्यमंत्री सहायता निधी'मध्ये जमा करण्याची घोषणा केली आहे. यावर बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले "राज्यातील सर्वच आमदार श्रीमंत नाहीत. अनेक लोकप्रतिनिधी हे ग्रामीण भागातील आहेत. त्यांना प्रवास, इतर कामांसाठी पगार आणि भत्ता मिळतो. तो निधी खर्च करून ते लोकांपर्यंत जातात. त्यामुळं विजय वडेट्टीवार यांची भावना जरी चांगली असली तरी ती व्यवहार्य नाही. हे मायबाप सरकार पूरग्रस्तांची काळजी घेईल."
Be the first to comment