बारामती - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५४ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने संत नामदेव महाराज व पंढरपूरच्या पांडुरंगाचा पायी पालखी सोहळा आळंदीकडे निघाला आहे. शनिवारी हा सोहळा पुरंदर तालुक्यातील नीरा येथे दाखल झाला. यावेळी निरा नदीवरील दत्त घाटावर दोन्ही पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तिर्थात स्नान घालण्यात आलं. यावेळी “विठ्ठल विठ्ठल” आणि "माऊली माऊलीच्या" या जयघोषांनी परिसर भक्तिमय झाला. २०१४ पासून सुरू असलेला पंढरपूरच्या विठ्ठल पायी पालखी सोहळ्यात यावर्षी भविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पांडुरंगाच्या पालखी सोबत रथाच्या पुढे १६ तर मागे ३५ दिंड्या सहभागी आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण तसंच कर्नाटकातील सुमारे साडेपाच हजार वारकरी या वारीत सहभागी झाले आहेत. सोहळ्यातील वारकऱ्यांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व संत ज्ञानेश्वर महाराज ट्रस्ट यांच्यावतीने पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. नामदेव महाराजांच्या पालखी सोबत त्यांचे वंशज माधव महाराज, मुकुंद महाराज, निवृत्ती नामदास, मुरारी नामदास, आदित्य रामदास आदी मानकरी उपस्थित होते. तसंच कीर्तनकार राममहाराज झेजुरके, बाळू महाराज उखळीकर, बाबा महाराज आजरेकर, सोपानकाका टेंबूकर, प्रमोद महाराज ठाकरे यांच्या नामसंकीर्तनाने वातावरण भारावून गेले. यानिमित्ताने नीरेतील झांबरे परिवार व शिंपी समाजाच्या वतीने विठ्ठल-नामदेव मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. नीरा स्नानानंतर दुपारी हा सोहळा विठ्ठल नामदेव मंदिरात विठ्ठलाचा पालखी सोहळा दत्तमंदिरात विसावाला होता. तर सायंकाळी हा सोहळा महर्षी वाल्मिकीची नगरी असलेल्या वाल्हे नगरीत मुक्कमासाठी दाखल झाला.
Be the first to comment