रायगड - तळकोकणातील विविध भागांमध्ये पेटलेला बॉक्साईड उत्खननाचा प्रश्न आता रायगड जिल्ह्यातही धगधगू लागला आहे. श्रीवर्धन तालुक्यातील गडब वाडी परिसरात सुरु असलेल्या बॉक्साईड उत्खननाविरोधात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. उत्खननामुळे गावाचा पर्यावरणीय समतोल बिघडत असून पाणीटंचाई, आरोग्याच्या समस्या आणि घरांवरील भूस्खलनाचा धोका वाढल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. परिस्थिती ताणतणावपूर्ण बनली असून काही वेळ पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये संघर्षही झाला.श्रीवर्धन तालुक्यातील गडब वाडी गावालगत मागील काही महिन्यांपासून बॉक्साईड उत्खनन सुरू आहे. या उत्खननामुळे गावातील विहिरी व झरे आटू लागले असून, पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. उत्खननस्थळी सातत्याने उडणाऱ्या धुळीमुळे श्वास घेणे कठीण झाले असून, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.गडब वाडी परिसर डोंगराळ असल्याने उत्खननादरम्यान सुरूंग लावले जातात. या स्फोटांच्या धक्क्यांमुळे गावातील अनेक घरांना भेगा पडत आहेत. “आमच्या जिवीतास धोका निर्माण होत आहे, घरांवर कधीही कोसळण्याची परिस्थिती आहे,” असा आरोप ग्रामस्थांनी केला. उत्खननामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे गावकरी संतप्त झाले आहेत.
Be the first to comment