शिर्डी - साईबाबा मंदिरातही दत्त जन्म उत्सव मोठ्या श्रध्देनं आणि उत्साहात साजरा करण्यात आला. साईबाबांच्या मंदिरात चांदीच्या पाळण्यात दत्त मूर्ती ठेवून 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' असं गुणगान केलं जातं. सांध्याकाळी 6 वाजता श्रीदत्त जन्माचा उत्सव साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षापासून चालत आलीय. यावेळी दत्त जन्माचं ह.भ.प. स्नेहल संजय कुलकर्णी (नाशिक) यांचं कीर्तन झाल्यानंतर दत्त जयंती साजरी करण्यात आली. साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी पाळण्याची दोरी ओढत दत्तजन्म उत्सव साजरा केला. त्यानंतर साई मंदिरातील धुपाआरती पार पडली. आज दिवसभर साईसमाधीजवळ श्री दत्त यांचा फोटो ठेवून त्याची पूजा केली जाते. साईबाबांना श्रीदत्त अवतार मानत या पावन दिवशी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्त शिर्डीमध्ये दाखल झाले. दत्त जयंतीनिमित्त साई मंदिर आणि परिसरातील, गुरुस्थान मंदिर, द्वारकामाई, चावडीला फुलांनी सजवण्यात आलं होतं. ही सजावट देणगीदार साईभक्त रजनी डांग यांच्या देणगीतून साकारण्यात आली. साईबाबा मंदिर परिसरातील दत्त मंदिरात आज सकाळ पासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
Be the first to comment