रायगड : पोलादपूर तालुक्यातील एसटी स्टँडची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना दररोज दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय. सांडपाणी व्यवस्थापनाची अत्यंत बिकट अवस्था, तसेच स्वच्छतागृहांची दयनीय परिस्थिती यामुळे संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर 'आपली माती, आपली माणसं' या सामाजिक संस्थेने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.पोलादपूर एसटी स्टँड परिसरातील सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सांडपाणी थेट उघड्यावर वाहत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरलेली असते. प्रवाशांसोबतच या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही यातून मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. याशिवाय महिला आणि पुरुष स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत दयनीय असून, तेथे नियमित स्वच्छतेचा पूर्ण अभाव आहे.स्थानिक नागरिकांनी आणि 'आपली माती आपली माणसं' संस्थेने या समस्येबाबत वारंवार एसटी महामंडळ व नगरपंचायत प्रशासनाला लेखी आणि मौखिक तक्रारी केल्या. मात्र, वारंवार केलेल्या सूचनांकडे प्रशासनाने दुर्लक्षच केल्याने संस्थेने थेट 'भिक मागो' आंदोलन छेडले. संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एसटी स्टँड परिसरात 'फिनेल नाही म्हणून आम्ही भिक मागतो' अशी फलकं घेऊन आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी संबंधित एसटी कंट्रोलर आणि सफाई कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, “फिनेल उपलब्ध नाही” अशी उत्तरं देण्यात आली. त्यामुळे संस्थेच्या सदस्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.
Be the first to comment