बदलापूर : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळा जवळ एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात दोनशेहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात महाराष्ट्रातील प्रवाशांचाही समावेश आहे. बदलापूरमध्ये राहणाऱ्या दीपक पाठक हे सुद्धा विमानात होते. दीपक हे एअर इंडियात क्रू मेंबर होते. "त्यांचा अजूनही फोन चालू आहे, जोपर्यंत अधिकृत माहिती मिळत नाही. तोपर्यंत आम्ही वाट पाहतोय," अशी प्रतिक्रिया दीपक पाठक यांच्या कुटुंबीयांनी दिली. अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बदलापुरातील रहिवाशी आणि एअर इंडियाचे क्रू मेंबर दीपक पाठक यांच्या मृत्यूची माहिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती समजताच दीपक यांच्या घरी नातेवाईक आणि मित्र दाखल झाले. दुपारी दीपक यांचं आईशी फोनवरून बोलणं झालं होतं. त्यानंतर दीपकशी काही संवाद झालेला नाही. यानंतर दीपक यांचा कोणाशी संपर्क झालेला नाही. दीपक पाठक यांच्यासह विमानाचे मुख्य कॅप्टन सुमित सभरवाल यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.