नागपूर : वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे या ठिकाणच्या जंगलात बेकायदेशीरपणे सुरू असलेला एमडी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना महसूल गुप्तचर संचलनालयानं उद्ध्वस्त केला. यानंतर स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू' अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनालयानं ही कारवाई केली. या कारवाईमध्ये 192 कोटी रुपये किंमतीचं 128 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आलं. या संदर्भात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना विचारले असता ते म्हणाले "मी आज वर्धा जिल्ह्याचा दौरा करणार आहे. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करणार आहे. या प्रकरणात स्थानिक पोलिसांचं अपयश दिसत आहे. एवढा मोठा कारखाना सुरू असतानाही तेथील पोलिसांना याची साधी कल्पना देखील नव्हती. हा परिसर पोलिसांनी सील केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे."
Be the first to comment