नागपूर - विरोधकांनी मोर्चे काढण्यास सुरुवात केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीदेखील आंदोलनाला उत्तर आंदोलनानंच उत्तर देण्याची रणनीती आखली आहे. भाजपा नेते परिणय फुके यांनी म्हटलं की, राहुल गांधी हे विदेशी निधीच्या माध्यमातून देशातील संविधान आणि लोकशाही व्यवस्थेबाबत अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या 5 नोव्हेंबर रोजी नागपुरात भाजपाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. ‘लोकशाही बचाव’ हा या आंदोलनाचा प्रमुख नारा असेल, अशी माहिती फुके यांनी दिली. देशभक्त नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केलं. राहुल गांधी यांच्या राजकीय भूमिकेवर टीका करताना फुके यांनी त्यांच्यावर देशाच्या संविधानाला कमकुवत करण्याचा आणि कम्युनिस्ट विचारसरणी आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी हेच देशासाठी ‘रेड फ्लॅग’ असल्याचं विधान त्यांनी केलं. तसेच राहुल गांधी यांच्या नावाचा आधार घेत त्यांनी ‘राहू’चा उल्लेख करत राजकीय टीका केली.